१ विचारशक्‍तीच्या जोरावर श्रेष्ठ ठरणारा माणूस…

– डॉ. सदानंद मोरे

( सौ. दैनिक सकाळ  )

विश्‍वाच्या अफाट पसाऱ्यात मनुष्याचे स्थान, तसे नगण्यच म्हणावे लागते; परंतु पृथ्वी नावाच्या ग्रहगोलाच्या संदर्भात मात्र मनुष्याने आपले श्रेष्ठत्व निर्विवादपणे प्रस्थापित केलेले आहे. पृथ्वीवरसुद्धा असे अनेक प्राणी आहेत की, ज्यांच्या शारीरिक बळापुढे माणूस निष्प्रभच होईल. तथापि, उत्क्रांतीच्या जीवनकलहात माणसाने या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात करून त्यांच्यासह सर्व सृष्टीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यश मिळवलेले दिसून येते. ज्या वाघाच्या पंज्याच्या एका फटकाऱ्यात माणूस गारद होईल, आणि ज्या हत्तीच्या एकाच टापेखाली चिरडून जाईल, त्या वाघाला आणि हत्तीला हा माणूस सर्कशीमध्ये आपल्या तालावर नाचवतो! चित्ता किंवा शहामृग असे वेगवान प्राणी सोडा, पण घोडासुद्धा माणसापेक्षा वेगाने पळतो; पण तरीही मोटार, रेल्वे अशा साधनांचा उपयोग करून मनुष्य सर्वांत अधिक वेगवान बनला. आकाशात विमानातून, तर पाण्यात पाणबुडीतून तो संचार करून मुळात भूचर असलेला हा मनुष्यप्राणी प्रसंगी अंतरिक्षगामी किंवा जलचर बनू शकतो.
माणसाच्या या यशाचे रहस्य कशात आहे? माणसाने सृष्टी ज्या पंचमहाभूतांनी बनलेली आहे, त्यांच्या जडणघडणीचे व क्रिया-प्रतिक्रियांचे नियम शोधून काढले. म्हणजेच विज्ञान. विज्ञानामुळे ज्ञात झालेल्या नियमांचा उपयोग करीत तो सृष्टीतील अनेक घटनांना व घडामोडींना आपल्याला अनुकूल असे स्वरूप देऊ शकतो. गरजेप्रमाणे अनुकूल घटना घडवून आणू शकतो. प्रतिकूल घटनांना प्रतिबंध करू शकतो. निदान त्यांच्या प्रतिकूलतेची तीव्रता कमी करू शकतो. उपलब्ध द्रव्यांचे कमी-जास्त प्रमाणात एकत्रीकरण करून वेगळ्या गुणधर्मांचे एखादे निराळेच द्रव्य बनवू शकतो. नवे द्रव्यसुद्धा उत्पादित करू शकतो. ज्ञात झालेल्या नियमांच्या आधारे तो आपल्याभोवती घडणाऱ्या घटना का घडतात, याचे स्पष्टीकरण करू शकतो आणि त्याचप्रमाणे अशा घटना भविष्यकाळात केव्हा घडतील याचे भाकीत तो करतो. एका मर्यादेत का होईना त्यांचे नियंत्रणही करतो.

हे सर्व माणूस करू शकला, ते कशाच्या बळावर? आपल्यातील शारीरिक बळाची कमतरता त्याने कशाने भरून काढली? अर्थातच बुद्धीने. बुद्धी हे त्याचे विचार करण्याचे इंद्रिय आहे, असे म्हटले तरी चालेल. बुद्धी आणि विचारशक्ती हे एकमेकांचे पर्याय म्हणून वापरता येतात.

मानवाच्या जीवनातील विचाराचे स्थान व महत्त्व लक्षात घेऊनच मानवाची व्याख्या करताना तो विचारशील- म्हणजे विचार करणारा प्राणी (ठरींळेपरश्र अपळारश्र) आहे असे म्हटले जाते. तो प्राणी तर आहेच, पण त्याचबरोबर प्राण्यांपेक्षा त्याचे वेगळेपणही तो जपतो. प्राण्यांजवळ नसलेली किंवा असलीच तर अगदीच कमी प्रमाणात असलेली विचारशक्ती हे त्याचे वैशिष्ट्य होय. याच शक्तीच्या जोरावर त्याने निसर्गाचे नियम शोधून काढले व तो इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळाच नव्हे, तर श्रेष्ठ ठरला.

ही विचारशक्ती तो ज्याप्रमाणे बाह्य सृष्टीच्या स्वरूपाचे आकलन करण्यासाठी वापरू शकतो, त्याचप्रमाणे अंत:सृष्टीला म्हणजे स्वत:ला-आत्मस्वरूपाला समजून घेण्यासाठीही वापरू शकतो. अंतर्बाह्य सृष्टी जाणून घेण्याची इच्छा म्हणजेच जिज्ञासा हा त्याच्या जणू अस्तित्वाचाच घटक आहे. जाणून घेतल्याशिवाय त्याला राहवत नाही, चैन पडत नाही, तो अस्वस्थ होतो. जसा तो तहान-भुकेने अन्नपाण्यासाठी तळमळतो तसाच तो जाणण्यासाठीही व्याकुळतो. अन्न-पाणी मिळाले की त्याला जशी तृप्ती मिळते, समाधान मिळते, त्याचप्रमाणे तो ज्ञानानेही तृप्त होतो; पण ज्ञानप्राप्तीसाठी विचार करावा लागतो. तुकोबा म्हणतात,
विचारवाचून । न पाविजे समाधान ।।

One thought on “१ विचारशक्‍तीच्या जोरावर श्रेष्ठ ठरणारा माणूस…

Leave a comment