१३ सिद्धान्त आणि व्यवहार

-डॉ. सदानंद मोरे

( सौ. दैनिक सकाळ  )

सिद्धान्त आणि व्यवहार यांच्यातील संबंध हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्यात प्राधान्य कशाला द्यायचे, याविषयी मतभेद आढळून येतात. सिद्धान्ताचे काम वैचारिक आहे, तर व्यवहाराचा संबंध प्रत्यक्ष कृतीशी येतो. कार्ल मार्क्‍स यांनी व्यवहाराचा संबंध श्रमाशी लावला. कृतिशील व्यवहारातूनच सिद्धान्त किंवा उपपत्ती आकाराला येते, असे त्याचे म्हणणे होते. मार्क्‍स काहीही म्हणो, परंतु सतत कार्यरत असणाऱ्यांनासुद्धा शुद्ध सिद्धान्ताचे आकर्षण असते व सैद्धान्तिक चिंतनाचे जगणे कृतिशील जीवनापेक्षा प्रतिष्ठेचे मानले आहे. मार्क्‍सला प्रिय असलेल्या ऍरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्त्यालासुद्धा चिंतन किंवा विचार करण्याची प्रक्रिया कृतीपेक्षा श्रेष्ठ वाटायची. ऍरिस्टॉटलचे मत समजून घेणे अवघड नाही. त्यानुसार माणूस कोणतीही कृती करतो ती स्वतःमध्ये असलेली एखादी उणीव भरून काढण्यासाठी, स्वतःजवळ नसलेली गोष्ट प्राप्त करण्यासाठी; परंतु ईश्‍वर हा परिपूर्ण आहे.

त्याच्याकडे अमुक एक गोष्ट नाही असे म्हणणे हे त्याच्या परिपूर्णतेला बाधा आणणारे ठरेल. त्यामुळे त्याने कोणतीही कृती न करणे, हेच योग्य. अर्थात तो काहीच न करता नुसता स्वस्थ बसला तर त्याचे अस्तित्व ठोकळ्यासारखे होईल. म्हणून ऍरिस्टॉटलने त्याला विचार करण्याचे काम दिले. पण तो विचार तरी कशाचा करणार? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे काहीच नाही म्हणून तो स्वतःचाच विचार करतो. आत्मचिंतन करतो.आता मानवासाठी ईश्‍वर हा आदर्श असेल, तर मानवाच्या बाबतीतही कर्मापेक्षा विचार म्हणजे ज्ञान श्रेष्ठ ठरते. त्यामुळेच की काय राज्यशास्त्र, नीतिशास्त्र अशा प्रत्यक्ष कर्माशी निगडित असणाऱ्या ज्ञानशाखांवर विपुल लेखन करणाऱ्या ऍरिस्टॉटलने तत्त्वतः चिंतनप्रधान जीवन अधिक श्रेयस्कर मानले!आपल्याकडेदेखील कर्म आणि ज्ञान यांच्यात द्वंद्व किंवा विरोध मानण्यात आला. अगदी प्रकाश आणि अंधार यांच्यातील विरोधाइतका तीव्र. अंतिम पारमार्थिक परब्रह्मरूपी सद्‌वस्तूचे स्वरूपच निव्वळ ज्ञानात्मक मानले गेले. याउलट भौतिक विश्‍व व त्यात नांदणाऱ्यांनी केलेले कर्म अविद्या किंवा मायेची निष्पत्ती; अतएव मिथ्या, हा मायावाद शंकराचार्यांनी मांडला, असे मानले जाते.

शंकराचार्यांच्या नावावर मांडण्यात येणारा मायावाद गृहित धरूनही ते कर्म करण्याच्या आड येणार नाही किंवा कर्मयोगाशी विसंगत नाही, असे टिळकांना आढळून आले. त्यामुळे शंकराचार्य अर्धे मान्य व अर्धे अमान्य असे त्यांच्याबाबत म्हणता येते. याउलट काही विचारवंतांना शंकराचार्यांचा मायावाद व कर्मयोग यांच्यात अंगभूत विसंगती असल्याचे जाणवले. न्या. रानडे हे एक असे विचारवंत. न्यायमूर्तींना ज्ञानेश्‍वरप्रणीत भक्तियोग व कर्मयोग मान्य होता; परंतु ज्ञानेश्‍वरांची विश्‍व आणि मानव यांच्याबद्दलची धारणा मायावादीच असल्याची न्यायमूर्तींची समजूत असल्यामुळे त्यांनी तेवढ्यापुरते ज्ञानेश्‍वरांचे तत्त्वज्ञान नाकारून रामानुजाचार्यांच्या विशिष्ट अद्वैत सिद्धान्ताचा स्वीकार केला. स्वतः टिळक ज्ञानेश्‍वरांना शंकराचार्यांच्याप्रमाणे निवृत्तिवादीच मानत होते. रानडे लिहित होते तेव्हा ज्ञानेश्‍वरांचा “चिद्विलास’ या नावे ओळखला जातो असा काही वेगळा सिद्धान्त असल्याचे मत कोणी मांडल्याचे दिसत नाही. मात्र, टिळकांनी गीतारहस्य लिहिले तेव्हा डॉ. अण्णा मोरेश्‍वर कुंटे यांनी ज्ञानेश्‍वरांचा “अमृतानुभव’ ग्रंथ शिवकल्याणांच्या नित्यानंद दीपिका या भाष्यासह प्रसिद्ध झाला होता. त्यात “चिद्विलास’ची मांडणी असून, हा विचार शंकराचार्यांच्या मायावादापेक्षा वेगळा असल्याची जाणीवही दिसून येते. मायावादात ज्ञान आणि कर्म यांच्यात विरोध मानण्यात येत असल्याने तो कर्मयोगास अनुकूल नव्हे; पण चिद्विलासवादात मात्र तसा विरोध मानण्याचे कारणच नसल्याने तो कर्मयोगाशी सुसंगत आहे, असे म्हणता येईल. त्यामुळेच एका बाजूला विश्‍वकल्याणाचे “पसायदान’ मागणारे म्हणजे प्रार्थना करणारे ज्ञानेश्‍वर, दुसरीकडे “अवघाचि संसार सुखाचा करीन’ असा कृतिकार्यक्रमही देऊ शकतात.

Leave a comment