६ कर्मकांडाचे स्तोम अन्‌ पर्यावरणाचे भान

                                                        – डॉ. सदानंद मोरे                                                                     ( सौ. दैनिक सकाळ  )

मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असल्याचे प्रस्थापित केल्यानंतर माणसाचे प्राण्यांशी आणि एकूणच सृष्टीशी काय नाते असावे, देवांशी काय नाते असावे, असे प्रश्‍न आपोआपच पुढे येतात. या संदर्भातील एक उत्तर असे आहे, की मनुष्य हा परमेश्‍वराने आपल्या स्वतःच्या प्रतिमेबरहुकूम निर्मिलेला असल्यामुळे तो त्याचा लाडका आहे. प्राण्यांसह सर्व सृष्टी त्याने मनुष्यासाठीच निर्माण केलेली आहे. त्यामुळे तिचा हवा तसा उपयोग करायचा मनुष्याला अधिकार आहे, हा झाला पूर्णतः मनुष्यकेंद्रित विचार.


काहींनी थोडासा व्यापक विचार केला. त्यानुसार मानवच काय, परंतु देवतासुद्धा एकूण सृष्टिचक्राचाच भाग आहेत. त्यांच्या परस्पर सहकार्यानेच सृष्टी चालते आणि यज्ञ नावाच्या क्रियेमुळे त्यांच्यात संबंध प्रस्थापित होऊन देवाणघेवाण शक्‍य होते. या विचारसरणीमुळे यज्ञकेंद्रित प्रारूप पुढे आले. यज्ञाला महत्त्व प्राप्त होऊन प्रत्येक गोष्ट यज्ञासाठीच निर्माण करण्यात आलेली असल्याचे प्रतिपादन करण्यात येऊ लागले. किंबहुना विश्‍वाकडे पाहायचे, विश्‍वाचा विचार करायचा तो यज्ञाच्या दृष्टीने, असा प्रकार सुरू झाला. कोणत्याही गोष्टीकडे ती “मेध्य’ (म्हणजे यज्ञात आहुती देण्यास योग्य) की “अमेध्य’ (अशा हविर्भागास अयोग्य) असेच पाहण्यात येऊ लागून याच प्रकारे वस्तुमात्राचे वर्गीकरण होऊ लागले. समाजरचनेवरसुद्धा यज्ञकेंद्रित विचारसरणीचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. पुरुषाने एकापेक्षा अधिक बायका करायच्या, त्यातील एक मुख्य तर इतर उपपत्नी; ते का, तर नित्य अग्निहोत्रासारखी क्रिया व कारणपरत्वे करावे लागणारे यज्ञ नीट पार पडावेत म्हणून! एखाद्या व्यक्तीच्या समाजातील स्थानाची निश्‍चिती करायची म्हटले तरीही यज्ञक्रियेत त्याचे स्थान कोठे व त्याने तेथे काय भूमिका, कोणते कार्य करायचे याचा विचार करावा लागे. समाजजीवनच यज्ञकेंद्रित झाले होते, असे म्हणायला हरकत नाही. यज्ञाच्या माध्यमातून माणसे आणि देवता एकमेकांना परिपुष्ट व बलवान करतात. यज्ञातील आहुती देवतांपर्यंत पोचून त्या संतुष्ट होतात. त्यामुळे पर्जन्य वगैरे नैसर्गिक घटना सुरक्षित होतात व परिणामतः मनुष्याला अन्नधान्य वगैरे जीवनावश्‍यक गोष्टी सुलभपणाने प्राप्त होतात. मीमांसकांच्या या विचारसरणीच्या स्वतः कृष्णानेही अर्जुनाला मनुष्याने कर्म करणे कसे आवश्‍यक आहे हे पटवून देण्यासाठी केला होता. “परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ’ हा गीतेतील विचार मीमांसकांच्या जवळ जाणारा आहे.


अर्थात, पुढे यज्ञाच्या कर्मकांडाचे इतके स्तोम माजले, की प्राणी आणि वनस्पतींचे अस्तित्वच धोक्‍यात येते की काय, अशी भीती जाणकारांना वाटू लागली. रतिदेव नावाच्या राजाने केलेल्या यज्ञात मारल्या गेलेल्या पशूंची चामडी ज्या नदीच्या तीरावर वाळत घातली होती, तिला चर्मण्वती (चंबळ) असे नाव पडले, ते त्या कातड्यांच्या प्रचंड प्रमाणामुळे. म्हणजेच देवतांच्या साह्याने – सहकार्याने सृष्टिचक्र नीट चालून मानवाचेही भले व्हावे या विचारातून कदाचित सुरू झालेला यज्ञ सृष्टीच्याच मुळावर येतो की काय, असे वाटू लागले. साहजिकच यज्ञविरोधी विचारांचे वारे वाहू लागले.


हे वारे यज्ञयागादी गोष्टी इतिहासजमा होत असलेल्या संत एकनाथांच्या काळातही वाहत होते. “अग्निहोत्राचा सुकाळ। वडापिंपळाचा काळ’ असे एकनाथ म्हणतात ते यामुळेच.


यज्ञाला विरोध करणारे काही विचारवंत अहिंसेचा पुरस्कार करणारे होते. काहींना त्यातील नासाडी बघवत नाही, मात्र काहींना पर्यावरणाचे भान होते, असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही.

Leave a comment