मराठ्यांची लेखनपद्धती

– डॉ सदानंद मोरे

(सौ . साप्ताहिक सकाळ )

राजनीतीवरील ग्रंथांची विपुल प्रमाणातील निर्मिती हे प्राचीन आणि ऐतिहासिक हिंदुस्तानचे वैशिष्ट्य होते. महाराष्ट्रातही हे वैशिष्ट्य दिसून येते आणि राजकीय जाणिवा, विचार, कृती यांच्या प्रकटीकरणाचे माध्यम “मराठी भाषा’ होती, हेही महत्त्वाचे आहे.

भारतवर्षात राजकीय विचारांची परंपरा फार प्राचीन आहे हे राजनीतीवरील संस्कृत ग्रंथांवरून सहज लक्षात येऊ शकते. देव आणि असुर यांचे द्वंद्व हा फार पुरातन विषय आहे. बृहस्पती आणि शुक्र हे अनुक्रमे देवांचे व असुरांचे गुरू; पण ते आध्यात्मिक गुरू नसून राजकीय गुरू होते. राजनीतीवरील उत्तरकालीन कोणताही ग्रंथ घेतला तरी त्यात या दोघांची नावे उद्‌धृत केलेली आढळतात यात संशय नाही. तत्कालीन ज्ञानकोशच मानल्या गेलेल्या महाभारतात तर शुक्र-बृहस्पतींसह अनेक राजकीय विचारवंतांच्या मतांचा ऊहापोह केलेला आढळतो. प्रत्यक्ष महाभारतकाळात स्वतः व्यास, श्रीकृष्ण, विदुर, भीष्म, उद्धव हे महत्त्वाचे राजनीतीज्ञ होते. त्यातील व्यासांची परंपरा काश्‍मिरी कवी क्षेमेंद्र यांच्यापर्यंत आली.

अर्थात या सर्व राजकीय विचारपरंपरेत सर्वांत गाजलेला ग्रंथ म्हणजे कौटिल्य अथवा आर्य चाणक्‍याने लिहिलेले अर्थशास्रज्ञ. तात्त्विकदृष्ट्या क्षेमेंद्र कौटिल्यापेक्षा ज्येष्ठ असले तरी राजकीय व्यवहारांचा तपशील कौटिल्याइतका क्षेमेंद्रात सापडत नाही.

क्षेमेंद्रानंतर कामंदक, सोमदेव सुरी असे काही महत्त्वाचे विचारवंत होते. दरम्यान भारतावर इस्लामी परचक्र आल्यामुळे व येथील राजे-महाराजे सत्ताभ्रष्ट झाल्यामुळे, त्याचप्रमाणे संस्कृत भाषेसही उतरती कळा लागल्यामुळे राजकीय जाणीव लुप्तप्राय झाली, स्वतंत्र राजकीय व्यवहार कुंठित झाला आणि अर्थातच राजनीतीवरील ग्रंथरचनाही थांबली.

महाराष्ट्रात या विद्येचे पुनरुज्जीवन झाले ही बाब खचितच भूषणावह आहे; पण हे पुनरुज्जीवन केवळ बौद्धिक कवायत नसून ते प्रत्यक्ष राजकीय व्यवहारातून घडून आले आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे ते मराठी भाषेतून झाले आणि एखादी गोष्ट मातृभाषेतून तेव्हाच व्यक्त होते, की जेव्हा ती जाणिवेच्या पातळीवर आत्मसात केली जाते. मराठ्यांची राज्यसंपादणी आणि राज्यविस्तार म्हणजेच स्वराज्य आणि साम्राज्य या गोष्टी ग्रॅंट डफ समजला त्याप्रमाणे अरण्यात अचानक पेटलेल्या वणव्यासारख्या अपघात असता; केवळ लुटालूट असती तर मराठीत राजनीतीवरील ग्रंथ निर्माण होतेच ना! मुळात मराठ्यांचा राज्यविस्तार जसा लक्षणीय होता तशीच त्यांची राजकीय जाणीवही सखोल होती व ती त्यांनी त्यांच्या भाषेत लिहिलेल्या लक्षावधी नव्हे तर कोट्यवधी पत्रांमधून सूत्ररुपाने व्यक्त झालेली दिसते ती त्यांच्या राज्यकारभाराला लगटून; पण त्याचबरोबरीने त्यांनी मराठीत राजनीतीवर स्वतंत्र लिखाणही केले.

यादवकाळात लुप्त झालेल्या राजकीय जाणिवेचे पुनरुत्थान शक्‍य झाले ते शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीमुळे. पारतंत्र्याच्या ऐन मध्यान्ही शिवनेरी किल्ल्यात जन्मलेल्या बालशिवाजीवर प्रारंभिक संस्कार मातोश्री जिजाऊंनी केले असले तरी बालपणीचा काही काळ शहाजीराजांसमवेत बंगलोरच्या जहागिरीत घालवताना शिवरायांना शहाजीराजांच्या दरबाराचा व कारभाराचा जो अनुभव आला असेल तो त्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसला असणार हे उघड आहे. “शिवभारत’कार परमानंद या समकालीन संस्कृत कवीने केलेल्या वर्णनानुसार पुत्राच्या कर्तृत्वाची खात्री पटलेल्या शहाजीराजंनी प्रभाकर या आपल्या पुरोहिताशी सल्लामसलत करून स्वपुत्राच्या क्षमतेला व कर्तृत्वाला वाव मिळण्यासाठी त्याची पुण्याच्या जहागिरीवर नियुक्ती करून पुण्याला रवाना केले. “पुण्यदेशाधिपत्य’ हा या संदर्भात परमानंदाने वापरलेला शब्द महत्त्वाचा आहे.

शिवाजीराजांना पुण्यास पाठवताना शहाजीराजांनी राज्यकारभारासाठी आवश्‍यक असलेली सर्व साधनसामग्री त्यांच्या समवेत दिली होती. त्यात अर्थात मनुष्यबळाचाही समावेश होता व जवळचे आप्त, अमात्य आणि ख्यातनाम अध्यापक राजांच्या समवेत होते. शिवरायांनी आपल्या गुरूंनी शिकवलेल्या विद्या आणि कला अशा आत्मसात केल्या, की ते गुरुजन संतुष्ट झाले, असेही परमानंद सांगतो. अशा अनेक शास्त्रांचा व कलांचा उल्लेख तो करतो. त्या संदर्भातील एक श्‍लोक महत्त्वाचा आहे –

श्रृतिस्मृतिपुराणेषु भारते दण्डनीतिषु

समस्तेष्वापि शास्त्रेषु काव्ये रामायणो तथा

प्रस्तुत श्‍लोकातील दंडनीतीचा म्हणजेच राजनीतीचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. प्राचीन भारतीय राजनीतीचा परिचय शिवरायांना झाला होता हे निःसंशय. शहाजीराजांनी दक्षिणेत निर्माण केलेल्या राज्यसृष्टीतील त्यांच्या वारसदारांनी पारंपरिक विद्येची जशी जाणीवपूर्वक जोपासना केली तशी करण्यास शिवाजीराजांना उसंत मिळाली नाही; परंतु त्यांची ही विद्या संभाजीराजांमध्ये संक्रमित झाली असे म्हणण्यास खचित जागा आहे. स्वराज्याच्या उद्योगात अहोरात्र गढून गेलेल्या शिवरायांना संभाजीच्या विद्याभ्यासावर जातीने लक्ष देणे शक्‍य नसले तरी आग्रा येथील बंदिवासाच्या काळात पारंपरिक राजनीतीचे मूलभूत धडे त्यांनी संभाजीला दिले असणे सहज शक्‍य आहे. दैववशात पुढे स्वतः संभाजीराजांनाही पारंपरिक संस्कृततज्ज्ञ पंडितांचा सहवास लाभला व या विद्येत रुची निर्माण झाली. त्यांनी आपला व्यासंग वाढवला. त्याचे फळ म्हणजे त्यांनी संस्कृतमध्ये सिद्ध केलेला “बुधभूषणम्‌’ हा ग्रंथ. या ग्रंथाचे स्वरूप राजनीती व इतरही क्षेत्रातील पारंपरिक सूक्तींचा संग्रह असे असले तरी त्यातून संभाजीराजांची दृष्टीही प्रकट होते. आपली निवड ही राजहंसाच्या नीरक्षीरविवेकाप्रमाणे असल्याची ग्वाही शंभूराजांनी दिली आहे. राजांचा विशेष भर कामंदकाच्या नीतीसारावर आहे.

संभाजीराजांना पकडून औरंगजेबाने त्यांची निर्घृण हत्या घडविल्यानंतर मराठी राज्याची धुरा राजांचेच धाकटे बंधू छत्रपती राजाराम महाराजांनी स्वीकारली. राजारामांनी स्वतः काही रचना केली नाही परंतु केशव पंडितांनी त्यांच्यासाठी राजनीती रचली होती. म्हणजेच राजारामांच्या राजकीय जाणिवाही पुरेशा समृद्ध झालेल्या होत्या याविषयी शंका उरत नाही.

परंतु मुख्य मुद्दा भाषेचा – मराठी भाषेचा आहे. संस्कृतमधील ग्रंथांचे अवलोकन करणे, ते समजून घेणे, त्यांच्यातील मजकूर निवडणे अशा गोष्टी कितीही महत्त्वाच्या असल्या तरी जोपर्यंत हा व्यवहार मराठी भाषेतून होत नाही आणि त्याला स्वानुभवाचा आधार मिळत नाही तोपर्यंत त्या पांडित्याच्या स्तरावरच रेंगाळण्याची शक्‍यता असते. महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असे आहे, की या सर्व राजकीय गोष्टी त्याने आपल्या अंगी मुरवून आपल्या भाषेतून प्रकट केल्या. अर्थात याचेही श्रेय शिवछत्रपतींकडेच जाते.

रामचंद्रपंत अमात्य यांच्या नावे “आज्ञापत्र’ नावाची जी कृती आहे ती खुद्द शिवाजी महाराजांच्या राजकीय जाणिवांचा आविष्कार करणारी आहे. पंतअमात्यांनी आज्ञापत्रातला उपदेश कोल्हापूरच्या संभाजीराजांना केलेला असो किंवा अन्य कुणाला, त्यांची प्रेरणा थोरले महाराज म्हणजेच शिवाजी राजेच आहेत हे निःसंशय. संस्कृत भाषेतील राजनीतीवरील ग्रंथांची निर्मिती खुंटल्यानंतर म्हणजेच राजकीय प्रज्ञाच थंड झाल्यानंतर व इतर देशी भाषांमधले त्या त्या भाषा बोलणाऱ्या लोकांच्या स्वतंत्र राजकीय व्यवहार संपुष्टात आल्यानंतर नव्या राजकीय जाणिवा मराठ्यांच्या अंतःकरणात उदित व्हाव्यात व त्यांची अभिव्यक्ती मराठी भाषेतून व्हावी या गोष्टीचे महत्त्व महाराष्ट्राला अद्यापही पुरेसे उमगलेले दिसत नाही.

आज्ञापत्रात प्रकट झालेली राजनीती हा एक नवोन्मेष होता. मध्ययुगातील इस्लामचे अतिक्रमण आणि युरोप खंडातून नव्याने येऊन हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर उभे असलेले फिरंग्यांचे संभाव्य आक्रमण यांना तोंड देण्यास परंपरेतून उपलब्ध असणाऱ्या राजनीतीवरील श्‍लोकांची पंडिती पोपटपंची करून चालले नसते. त्यासाठी नव्या परिस्थितीच्या संदर्भातील नवे चिंतनच आवश्‍यक होते. शिवाजी महाराजांनी ते केले व त्यानुसार राजकारणही केले. म्हणून ते नव्या युगाचे प्रवर्तक – शककर्ते होऊ शकले.

शिवछत्रपतींची दृष्टी लाभलेला त्यांच्या तोलामोलाचा पुरुष नंतरच्या काळात कोणी झाला नसला तरी एकदा जागृत झालेल्या राजकीय जाणिवा मात्र उशिरापर्यंत सजग राहिल्या. नाना फडणिसांनी लहान सवाई माधवरावांसाठी “सवाई माधवरावशिक्षा’ करवून घेतली हे या सजगतेचेच लक्षण होय. अर्थात तोपर्यंत शिवछत्रपतींच्या मूळ बैठकीापासून आपण खूपच दूर गेलो होतो. ज्या टोपीकर फिरंग्यांचे संभाव्य संकट ओळखून शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती केली – जी गोष्ट अकबरापासून औरंगझेबापर्यंतच्या समर्थ मोगल बादशहांच्या स्वप्नीही आली नव्हती ती केली; परंतु याच छत्रपतींची ही नवनिर्मिती सांभाळणाऱ्या आग्र्यांचा नाश करण्यासाठी बाजीराव-चिमाजीआप्पांपासून तर नानासाहेब पेशव्यांपर्यंतचे राज्यकार्यधुरंधर कंबर कसून होते. शेवटी नानासाहेबांनी इंग्रजांच्या मदतीने हे शतकृत्य केले त्या दिवशी शिवरायांच्या राजनीतीचा आत्माच हरवला.

अर्थात या झाल्या तत्त्वांच्या लंब्याचौड्या गोष्टी. क्षेमेंद्राप्रमाणे मराठ्यांकडे अशी तत्त्वेच असती तर त्यांचा फारसा उपयोग झाला नसता. तत्त्वांबरोबर तपशिलांचा व्यवहारही सांभाळावा लागतो. हा व्यवहार राजकीय जाणिवांचा अपरिहार्य भाग मानावा लागतो. जाणिवेची जागृती याचा अर्थ झोप उडवून बिछान्यात बसून राहणे नव्हे तर चलनवलन करण्यास वा उद्योगास लागणे होय. ही हालचाल झाली तरच ती जाणीव भाषेत उतरू शकते.

यांच्या या बारीकसारीक हालचालींचा तपशील त्यांच्या पत्रव्यवहारांतून उपलब्ध होऊ शकतो. शब्द, अर्थ आणि कृती या तिन्ही गोष्टींचे दर्शन घडविणारी मराठ्यांची लक्षावधी नव्हे तर कोट्यवधी पत्रे उपलब्ध आहेत. इंग्रजांप्रमाणे प्रशासनाचे पद्धतशीर धडे देणारा अभ्यासक्रम सिद्ध करून त्यावर आधारित आय.सी. एस. सारखी परीक्षा वगैरे घेण्याची यंत्रणा मराठ्यांनी उभारली नाही हे खरे आहे; परंतु त्यांच्याकडे त्याची काहीच सैद्धांतिक चौकट वा पद्धती नव्हती असे मात्र नाही. मराठ्यांची राजकीय व प्रशासकीय लेखनपद्धती हाच एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

ंशिवरायांच्या आज्ञेवरून सिद्ध करण्यात आलेल्या राज्यव्यवहारकोशातही लेखनपद्धतीला स्पर्श केलेला आहे; परंतु त्याचा विस्तार पाहायचा असेल तर एखाद्या मेस्तकाचाच आधार घ्यायला हवा.

महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे, की मराठ्यांची लेखनपद्धती यादव राजांचा श्रीकरणाधिप किंवा पंतप्रधान हेमाद्री पंडितांनी सिद्ध केल्याचे मानले जाते. याच हेमाद्री पंडितांनी मोडी लिपी आणली अशीही समजूत आहे. भाषेचा व लिपीचा संबंध राजकीय कार्यबाहुल्याशी कसा असतो हे आपण पाहिले आहेच. हेमाद्रीच्या काळात मराठ्यांच्या कामाचा व्याप वाढला होता तसाच तो शिवकाळातही वाढला.

हेमाद्रीची मूळ लेखनपद्धती पूर्णपणे शुद्ध देशी वळणाची असणार हे उघड आहे. त्यानंतरच्या इस्लामी राजवटीत तिच्यावर इस्लामी पद्धतीचा व पर्शियन भाषेचा परिणाम झाला असणार हे वेगळे सांगायची गरज नाही.

लेखनपद्धती

शिवकालीन इतिहासाच्या साधनांची चिकित्सा करताना इतिहाससंशोधक वा. सी. बेंद्रे यांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची मदत घेतली आहे. लेखनपद्धतीच्या प्रकाराला “लेखनप्रशस्ती’ असे पारिभाषिक नाव आहे. या लेखनप्रशस्तीत मायन्यांना व रेघांना फारच महत्त्व असे. निरनिराळ्या मायन्यांच्या आडव्या रेघा कशा काढाव्यात याचे वर्णन हेमाद्री प्रथम करतात त्यानुसार “शंकराचार्यादि गुरूंना सहा, राजाला पाच, सेवक व शत्रू यांना दोन आणि पुत्रकन्यकादि मंडळींना एक रेषा द्यावी’.

प्रत्यक्ष लिहिण्याला प्रारंभ करण्यापूर्वी कागद उभा मांडून किंवा त्याला घड्या घालून त्याचे रकाने पाडावे लागतात. अशा दोन घड्या घातल्या, की कागदाचे चार रकाने पडतात. (जुन्या पिढीतील वकील किंवा कोर्टातील कारकून अजूनही क्वचित कागदाच्या घड्या करून रकाने पाडून लिहितात हे जाणकारांना सांगायला नको) हे आपल्या प्राचीन लेखनपद्धतीचे अवशेष होत. आता पुढील तपशील राजवाड्यांच्या भाषेत –

“”आता कागद मोडल्यावर श्रीकाराच्या खालील पहिली ओळ किती तऱ्हेने काढता येते ते सांगतो. कागद उजव्या बाजूने मोडून त्याचे चार रकाने पडतात. रेघ चार रकाने ओढली म्हणजे म्हणजे तीस “सबंध रेघ’ म्हणतात. तीत पहिल्या रकान्यात एका अक्षराची जागा कोरी ठेवली म्हणजे तिला “दफे’ म्हणतात. दोन अक्षरांची ठेवली म्हणजे “दफाते’ म्हणतात, तीन अक्षरांची ठेवली म्हणजे “कर्ते’ म्हणतात व चार अक्षरांची ठेवली म्हणजे “महजर’ म्हणतात. पहिल्या दोन रकान्यात पुरतील तेवढी रेघ ओढली म्हणजे तीस “पहिली जिल्हे’ म्हणतात. नुसत्या तिसऱ्या व चवथ्या रकान्यापुरतीच रेघ ओढली व पहिले दोन रकाने मोकळे ठेविले म्हणजे त्या रेघेस “दुसरी जिल्हे’ म्हणतात. मधील, दुसरा व तिसरा असे रकाने भरून शिवाय पहिल्या व चवथ्या रकान्यांतील दोन दोन अक्षरांची जागा घेऊन रेघ ओढली म्हणजे त्या रेघेला “बीत’ म्हणून संज्ञा आहे. याच “बीत’ रेघेस अकार प्रारंभी लावला म्हणजे त्या रेघेला अज्‌ म्हणण्याचा संप्रदाय आहे. एकार लाविला म्हणजे एकूणहत्‌ म्हणतात. बाक देऊन “बीत’ रेघेचा प्रारंभ केल्यास “वास्‌लात’ म्हणण्याचा परिपाठ आहे.”

यातील बहुतेक शब्दांना राज्यव्यवहारकोशात प्रतिशब्द दिले आहेत. राजकीय व्यवहारांचे लेखन करण्यासाठी किती तांत्रिक व सांकेतिक व्हायला लागते हे मराठ्यांकडून शिकावे असे म्हटले तर?

Advertisements

One comment on “मराठ्यांची लेखनपद्धती

  1. Shreekant says:

    Khup sundar sir

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s