वारकरी संप्रदायाची आधुनिक काळातील मांडणी-चर्चाविश्वांची चिकित्सा

( सौ. दैनिक प्रहार )

महाराष्ट्राची गेल्या पन्नास वर्षातील वाटचाल पाहात असताना आधुनिक काळातील वारकरी संप्रदायाच्या मांडणीची चर्चा करणे म्हणजेच वारकरी संप्रदायाला महाराष्ट्राच्या समाज जीवनात असलेले कळीचे महत्त्व, त्याचा येथील जनमानसावर असलेला खोलवर प्रभाव व त्याची दखलपात्र स्थिती मान्य करणे होय. वारकरी संप्रदायाच्या बाबतीत आधुनिक काळ म्हणजे नेमका कोणता काळ याची मांडणी होणे आवश्यक ठरते. साधारणत: आपण ज्याला आधुनिक काळ मानतो, तो म्हणजे पेशवाईच्या अस्तानंतरचा काळ होय. इथे आपण आधुनिकतेचा एक विशिष्ट अर्थ गृहीत धरतो; पण पेशवाईमध्येदेखील आधुनिक शब्दाचा वापर काहीशा वेगळ्या अर्थाने झालेला आपल्यास पाहावयास मिळतो.

दुस-या बाजीराव पेशव्याच्या काळात जातीयवादाने उचल खाल्ली. काही महत्त्वाच्या समकालीन शाहिरांनी याला ब्राह्मणी राज्य म्हटले. धाकटा बाजीराव एका बाजूला धार्मिक कर्मकांडाला व दुस-या बाजूला नाचगाण्याला, मनोरंजनाला स्थान देणारा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात तो पहिलाच असा राज्यकर्ता होता, जो स्वत: वारीला जाऊ लागला. याच काळात ब्राह्मण समाजातील काही लोकांना असे आढळले की, वारकरी संप्रदायातील काही ब्राह्मण वारकरी हे संत तुकारामांचे अभंग गात आहेत. तत्कालीन चातुर्वण्र्य व्यवस्थेत तुकाराम कनिष्ठ दर्जाचा होता व त्याचे अभंग आपण कसे म्हणायचे, शूद्र हा ब्राह्मणाचा गुरू कसा होऊ शकतो, हे प्रश्न त्यांना पडले. यावर त्यांनी असा उपाय शोधला की, वारीत तुकारामांचे अभंगच म्हणायचे नाहीत! याबाबत श्रीवर्धनचा दाखला प्रसिद्ध आहे. तेथील ब्राह्मणांनी पारायणात, सप्ताहात तुकारामांचे नावदेखील घ्यायचे नाही, असा अलिखित नियमच बनवला होता. या कृतीचा तसेच बाजीरावाच्या वारीमध्ये तुकारामांचे अभंग न म्हणण्याच्या आदेशाला तत्कालीन समाजातील अनेकांनी विरोध केला. त्यापैकी महत्त्वाचे तत्त्वज्ञ- कवी मोरोपंत होत. त्यांनी आपल्या एका आर्येमध्ये तुकारामांची स्तुती केलेली आढळते. तर बाजीरावाला दूषणे दिली आहेत. बाजीरावाला ते आधुनिक असे संबोधतात. म्हणजे कालपर्यंत चालत आलेली परंपरा आज मोडणारा तो आधुनिक! खरं तर बाजीरावाने वर्णधर्मी परंपरेचाच अंगीकार केलेला दिसतो. म्हणजे पेशवाई काळात मोरोपंतांनी आधुनिक हा शब्द समकालीन या अर्थाने वापरला आहे. आपण मात्र पाश्चिमात्य युरोपमधून आलेले ज्ञानविज्ञान व त्या आधारावर येथील सनातनी-पारंपरिक व्यवस्थेची केलेली चिकित्सा हा आधुनिकतेचा गाभा मानतो.

वारकरी संप्रदायाच्या चर्चाविश्वांचा विचार करताना त्याचा इतिहास नेमकेपणाने पाहणे गरजेचे आहे. वारीला साधारणत: तेराव्या शतकापासून सुरुवात झाली तेथपासून ते अठराव्या शतकापर्यंत म्हणजे जवळ जवळ पाचशे वर्षे महाराष्ट्राची साहित्य निर्मिती ही वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने झाली किंवा या काळात झालेल्या साहित्याच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा वाटा होता. महानुभाव संप्रदायाचे साहित्य, बखर साहित्य हेदेखील याच काळातील असले तरी ते वारकरी संप्रदायासारखे सर्वदूर सहज पसरलेले व सामान्यांची भाषा बोलणारे कधीच नव्हते. औरंगजेबाच्या निधनानंतर दिल्लीत जरी मुस्लिमांची सत्ता असली तरी संपूर्ण भारताचा विचार केला तर प्रत्यक्षपणे भारतात दोन तृतीयांश ठिकाणी मराठ्यांचेच वर्चस्व होते. पुढे ते काही कारणांनी मराठ्यांच्या हातून गेले.

1818 साली पेशवाई गेली तर 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे नियतकालिक सुरू केले. म्हणजे केवळ 14 वर्षाच्या अंतरानेच महाराष्ट्रात आपल्या पराभवाची वैचारिक प्रक्रिया सुरू झाली. तत्कालीन महाराष्ट्रातील समाजजीवन हे मुख्यत: धर्मावर आधारित होते. त्यामुळेच येथील सुधारणावाद्यांनी सर्वप्रथम धर्म सुधारणेचा पुरस्कार केला.

सुरुवातीच्या परमहंस सभेतून पुढे प्रार्थना समाज व सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली. प्रार्थना समाजातील लोक हे उच्चभ्रू, शिक्षित होते. यात न्या. रानडे, तेलंग यांचा समावेश होता. तर सत्यशोधक समाजातील लोक अल्पशिक्षित व बहुजन होते. या तिघांच्याही केंद्रस्थानी संत तुकाराम होते. प्रार्थना समाजाने तर संत तुकारामांना आपले हिरोच मानले होते.

1864 साली महाराष्ट्रात पहिल्यांदाच वारकरी संप्रदायाचा एक संप्रदाय म्हणून अभ्यास करण्याचे श्रेय लोकहितवादी तथा गोपाळ हरी देशमुख यांना जाते. लोकहितवादींनी वारक-यांविषयी आपले निरीक्षण नोंदवताना असे म्हटले की, ज्याच्या गळय़ात माळ व हातात पताका तो वैष्णव, तो जातीभेदातून बाहेर आला आहे.

लोकहितवादींनी वारकरी संप्रदायाबद्दल लिहिताना एक महत्त्वाचा दृष्टिकोन मांडला आहे. ते म्हणतात, वारकरी संप्रदाय क्षीण झाला. कारण तो आपला वेगळा कायदा निर्माण करू शकला नाही, तसा कायदा वेगळा असायला हवा, असे लोकहितवादींनी स्पष्टपणे म्हटले.

लोकहितवादींनी ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ व कबीर यांना मुख्य संत मानले आहे. वारकरी संप्रदायात उत्तरेतील केवळ संत कबीरांची वचने ऐकवली जातात. पूर्वी काशीहून वारीसाठी कबीरांची दिंडी दरवर्षी येत असे. ती 1920मध्ये बंद झाली. वारकरी संप्रदायाची ब्राह्मणी व अब्राह्मणी अशी मांडणी लोकहितवादींनी केली नव्हती. पुढे जोतिबा फुले यांनी संघटनेच्या गरजेपोटी तसेच त्यांच्या काळात माजलेल्या कर्मकांडांच्या भडिमारामुळे तशी मांडणी केलेली आढळते. वारकरी संप्रदायात राहून संप्रदायाच्या ब्राह्मणीकरणाची कोंडी फोडली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यातून बाहेर पडून फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मात्र फुल्यांच्या या नव्या संघटनेला मिळालेली कुमक ही वारकरी पंथातूनच मिळाली होती, हे मात्र विशेष.

पण वारकरी संप्रदाय हा ब्राह्मण आणि अब्राह्मण यांच्या पलीकडे आहे, हे आधी लोकहितवादी व पुढे राजारामशास्त्री भागवत यांनी सार्थपणे दाखवून दिले. न्या. रानडे यांनी वारकरी संप्रदायाचा शिस्तबद्ध अभ्यास करण्याचा पायंडा पाडला. त्यांनी वारीतील अनेक पालख्यांना व दिंड्यांना भेटी देऊन त्यांच्यातील शिस्त, परंपरा, वारीला आलेल्या लोकांच्या नेमक्या जाती व कुळे यांच्या नोंदी केल्या. पुण्यातून जाणा-या दिंड्यांत सर्व जाती-जमातींचा समावेश असतो, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

जोग व मामासाहेब दांडेकर यांनी कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबाला वारीकडे वळवले. विष्णू भिकाजी कोलते या मराठा कुटुंबात जन्माला आलेल्या व वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी लाभलेल्या अभ्यासकाने महानुभाव संप्रदाय ही ब्राह्मणेतर चळवळ ठरवली. मात्र ते निखालस चुकीचे आहे. कारण एक कृष्णदेव सोडला, तर त्यांच्या पाच देवांमध्ये बाकीचे चारही ब्राह्मण आहेत.

वारकरी संप्रदाय हा ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर यांच्यामध्ये अडकलेला नसून, तो सत्याची बाजू घेणारा आहे. वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक व अस्सल मराठी आहे.

( परिवर्तनाचा वाटसरू’ प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. सदानंद मोरे यांनी ‘वारकरी संप्रदायाची आधुनिक काळातील मांडणी-चर्चाविश्वांची चिकित्सा’ या विषयावर केलेल्या मांडणीचे अमोल गवळी यांनी केलेले हे शब्दांकन…)

Leave a comment