१२…आता उरलो उपकारापुरता

– सदानंद मोरे

( सौ. दैनिक सकाळ  )

माणसाचा ज्ञातृत्व कर्तृत्वभोक्वृत्वादि सर्व व्यवहार अंतिमत: अविद्येच्या क्षेत्रातील म्हणजेच चैतन्यरूप आत्म्यावर देहादि जड अनात्म वस्तूंच्या झालेल्या अध्यासातून होत असतात, असे एकदा गृहीत धरले म्हणजे हे व्यवहार जितक्‍या लवकर थांबतील तितके बरे, अशा इच्छा होणे साहजिक आहे. हीच मोक्षाची इच्छा किंवा मुमुक्षा. ज्याच्याकडे ही इच्छा आहे, त्याला “मुमुक्षु’ असे म्हणायचे. संतसाहित्याचे अभ्यासक लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनी चालविलेल्या नियतकालिकाचे नावच “मुमुक्षु’ होते, हे आठवत असेल.

तपशिलात न जाता असे समजू, की अशा एखाद्या मुमुक्षूला खरोखरच मोक्ष मिळाला. म्हणजे त्याला आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले आणि आपण आजवर करीत आलेलो कर्म हे अज्ञानाने स्वतःवर कर्तृत्वभाव लादून करीत होते, हे त्याला समजले तर मग तो कर्म करणे थांबवील, की तसेच चालू ठेवील? 

भारतीय विचारधारेत हा एक महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आद्य शंकराचार्यांनी अत्यंत ठामपणे या प्रश्‍नाचे उत्तर नकारात्मक, म्हणजे असा ब्रह्मज्ञानी जीवन्मुक्त पुरुष कर्म करणार नाही, असे दिले. हे उत्तर आचार्यांच्या एकूण विचारव्यूहाशी सुसंगत आहे, असेच म्हणावे लागते. त्याचे तात्त्विक कारण म्हणजे ज्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अहंकार शिल्लकच नाही आणि ज्याने सर्वोच्च सिद्धी प्राप्त केली आहे, मोक्ष नावाचा परमपुरुषार्थ साधला आहे, तो आपली वरची पायरी सोडून खाली कशाला येईल? ज्याला या ज्ञानपूर्व व्यवहारांची निष्फलता व निरर्थकता पूर्णपणे समजून चुकली आहे, तो या भानगडीत पडणारच नाही.पण मग सर्वांनीच कर्म करण्याचे सोडून द्यावे, असे शंकराचार्यांना म्हणायचे होते की काय, असा प्रश्‍न कोणालाही पडावा. त्याचे उत्तर निःसंदिग्धपणे “नाही’ असे द्यावे लागते. उलट ज्याला ज्ञानाचा अधिकार नाही, म्हणजे जो ज्ञानास पात्र नाही, त्याने कर्म करायलाच हवे, असेच त्यांचे मत आहे आणि वस्तुस्थिती अशी आहे, असे पात्र साधक लाखात एक, या प्रमाणात तरी आढळतील का, याची शंका यावी आणि मग इतक्‍या कमी संख्येने अस्तित्वात असलेल्या व्यक्तींनी कर्म केले काय आणि न केले काय, त्याने असा काय मोठा फरक पडणार आहे? येथे मुद्दा संख्येचा नसून, तत्त्वाचा आहे. एकदा ज्ञानापुढे कर्म गौण आहे, असे मानले तर कर्म करणाऱ्यांच्या मनात कर्माविषयी तुच्छता निर्माण होईल. आपल्याला ज्ञानप्राप्तीचा अधिकारच नसल्यामुळे नाइलाज होऊन आपणास या चक्रात फिरावे लागते, असे त्यांना वाटेल म्हणून कार्याची प्रतिष्ठा कमी होऊन चालणार नाही. शंकराचार्यांच्या काळात पूर्वमीमांसा दर्शनाच्या पुरस्कर्त्यांनी कर्मकांडाचे स्तोम माजवले होते. शंकराचार्य बहुधा त्याविरुद्ध प्रतिक्रिया करीत असावेत. कारण काहीही असो, त्यामुळे कर्माचे महत्त्व कमी झाले हे खरे. अशा परिस्थितीत साक्षात आचार्यांच्या गीताभाष्याला आव्हान देऊन कर्माच्या प्रतिष्ठेची पुनःस्थापना करण्याचे कार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले. सामान्य माणसाने कर्म करीत राहावे, हे तर शंकराचार्यांनाही मान्यच होते. टिळकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आत्मज्ञान झाल्यानंतरसुद्धा कर्माचा त्याग करता कामा नये, असे निक्षून सांगितले. आता आत्मज्ञानी माणसाला प्राप्तव्य उरलेले नसल्यामुळे त्याने कर्म का करायचे, या प्रश्‍नावर टिळकांचे सांगणे असे आहे, की त्याने स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी कर्म करावे. यालाच गीतेच्या भाषेत लोकसंग्रह असे म्हणतात. ज्ञानाचा अधिकार येऊन मोक्षास पात्र झालेला मनुष्यसुद्धा समाजाचे देणे लागतच असतो. या समाजाच्या भरणपोषणासाठी त्याने जनक राजाप्रमाणे कर्म करावे. शिवाय त्याचे कर्म स्वार्थविरहित असल्यामुळे ते आदर्शभूत ठरणार. टिळकांचा हा आशय तुकोबा एका कडव्यात व्यक्त करतात-

“”तुका म्हणे आता। उरलो उपकारापुरता।।”

Leave a comment